जुन्नर तालुक्यातील विजय गाडगे यांचा राज्यस्तरीय समाजमहर्षी पुरस्काराने गौरव
1 min read
जुन्नर दि.९:- राष्ट्रसेवा परिषद, पुणे आणि मराठबोली संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजच्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील विजय गणपत गाडगे यांना राज्यस्तरीय “समाजमहर्षी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या राज्यभरातील अनेक गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेली बारा वर्ष सातत्याने विजय गाडगे जिल्हा परिषद शाळा निमगाव सावा येथील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन, शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी ई लर्निंग संच भेट तसेच गावातील
विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी भरघोस आर्थिक मदत त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता दहावी व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचे मौलिक विचार तसेच राजांचे छायाचित्र असलेल्या पॅडचे वाटप करतात. वार्षिक स्नेहसंमेलन आयोजनामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी
त्या कार्यक्रमासाठीचा मोठा आर्थिक भार उचलला. यापुढे देखील गोरगरीब तसेच गरजू आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे दृष्टीने जे जे करता येईल ते ते करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
राष्ट्रसेवा परिषद पुणे आणि मराठा बोली पुणे या संस्था महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात समाजासाठी उल्लेखनीय काम करणार्या व्यक्ती आणि संस्था यांचा शोध घेऊन त्यांना व त्यांच्या निस्वार्थी कार्याला समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतात.
यामध्ये प्रामुख्याने नवीन होतकरू व्यक्ती आणि संस्थांना स्थान देण्यात येते. त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कार्यास प्रेरणा देणे व त्यांचे कार्य समाजासमोर आणणे हा या संस्थांचा प्रांजळ प्रयत्न असतो.या कार्यक्रमासाठी राष्ट्रसेवा परिषदेचे संस्थापक परमेश्वर उमरदंड, मराठबोलीचे अध्यक्ष शिवाजी भापकर,
कार्याध्यक्ष साहेबराव पवळे, राष्ट्रसेवा परिषदेच्या अध्यक्षा तेजस्वी आमले, कार्याध्यक्षा प्रिया खैरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सचिन कुरकुटे यांनी केले.