जुन्नर सोसायटीत बांगलादेशी बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या माय-लेक ATS च्या ताब्यात
1 min read
जुन्नर दि.६:- येथील शहरातील शिपाई माई मोहल्ला या भरलोक वस्तीतील एका इमारतीमध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदा राहात असताना दहशतवाद विरोधी शाखा पुणे व जुन्नर पोलिसांच्या पथकाने याठिकाणी कारवाई करत एका महिलेला तिच्या लहान मुलासह ताब्यात घेतले असून पती मिळून आला नसून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बांगलादेशींनी भारतात प्रवेश केल्यानंतर भारताचे रहिवासी असल्याचे बनावट कागदपत्र तयार केली. यात बनावट आधार, मतदान व पॅनकार्ड, वाहनचालक परवाना व पासपोर्ट मिळून आला आहे. घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करीत या पती-पत्नीने ते बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही ही माहिती त्यांनी पोलिसांना दिलेली नव्हती.
झालेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. साथी शहाआलम मंडल आणि शहाआलम अब्दुल मंडल (दोघे रा. जुन्नर, मूळ रा. बांगलादेश) या पती-पत्नी विरोधात पारपत्र अधिनियम परकीय नागरिक आदेश बी. एन. एस.च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यामधील पत्नीला तिच्या लहान मुलासह ताब्यात घेण्यात आले असून तिचा पती मिळून आला नाही. पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी आणि दहशतवाद विरोधी शाखामधील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, विशाल गव्हाणे, रवींद्र जाधव यांच्यासह जुन्नर पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
शिपाई मोहल्ला येथील रिजवान हाईट्स मधील एका सदनिकेत बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकांनी या इमारतीमध्ये जाऊन सदनिकेची तपासणी केली असता तेथे ही महिला मिळून आली.
भारतीय नागरिकाबाबत तिच्याकडे पुरावे मागितले असता तिने नीटपणे उत्तरे न देता आपण बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. ती व तिचा पती येथे आल्याचे सांगत त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे सांगितले.
पोलीस अंमलदार विनोद पवार यांनी याबाबतची फिर्याद जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल केली असून परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी यांच्या मार्गदर्शनाखाली पूढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.