चैत्रशुध्द एकादशी निमित्त पांढरी दुमदुमली; तीन लाख भाविक
1 min read
पंढरपूर दि.९:- चैत्रशुध्द एकादशी निमित्त हरी हर्रच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली.जवळपास तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. उन्हाचा फटका बसू नये म्हणून मंदिर समितीने दर्शन रांगेत पाणी, सरबत, उपवासाचे पदार्थ, वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. दरम्यान, या एकादशीला श्री विठ्ठलास पुरण पोळीचा नेवैद्य तर रखुमाई आणि भक्तांचा उपवास करण्याची परंपरा आहे. वारकरी संप्रदायात आषाढी , कार्तिकी , माघी आणि चैत्री यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. या चैत्री यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाख भाविक दाखल झाले.
एकादशीला चंद्रभागा नदीचे स्नान, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन करून वारी पोहचती केली जाते. या चैत्री एकादशीच्या दिवशी कर्नाटकातील हंपी येथे कृष्णदेव राजा यांच्या कडून संत एकनाथ महाराज यांचे आजोबा भानुदास महाराज यांनी पांडुरंगाची मूर्ती पंढरीत आणून प्रतिष्ठापणा केली.
म्हणून या दिवशी देवाला पुरण पोळीचा नेवैद्य दाखविण्याची शेकडो वर्षाची परंपरा वारकरी संप्रदाय मध्ये आहे.देवाला जरी पूर्ण पोळीचा नेवैद्य दाखविला जात असला तरी साक्षात रखुमाई आणि भाविकांनी एकादशीचा उपवास केला जातो.
शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी जाणार्या शंभू महादेवाच्या कावडी पंढरपूरात दाखल झाल्या होत्या. या कावडी शिखर शिंगणापूर येथे घेवून जाण्याची प्रथा आहे. त्यामुळे पंढरी नगरीत हरी हर चा जयघोषाने दुमदुमून निघाली आहे. या यात्रेसाठी पालिकेने स्वच्छता, मोफत पार्किंग, चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांची राहण्याची सोय यासह वीज,
पाणी, शौचालय, दवाखाना आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.दर्शन रांगेत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पत्राशेड, पिण्याचे पाणी,उपवासाचे पदार्थ, वैद्यकीय सुविधा देण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. पदस्पर्श दर्शनास साधारणपणे ७ ते ८ तास लागत आहे.
एकादशी निमित्त विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज तर रखुमाईची पूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक झाली. दरम्यान शहरात काही भागत अस्वछता दिसून आली.असे असले तरी भाविकांनी देवाचे दर्शन घेत वारी पोहचती केली.