व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे आनंदमयी स्वागत
1 min read
नगदवाडी दि.५:- “विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल”, कांदळी’ येथे शुक्रवार दि.४ रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2025- 26 चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना आनंदमयी वातावरणात शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा उत्साह होता.शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी एक विशेष स्वागत सोहळा आयोजित केला. त्यामध्ये कलाशिक्षक रोशन बनकर व सर्व शिक्षक सहकारी, शिक्षिका यांनी तयार केलेल्या सेल्फी पॉईंट व त्यामध्ये विद्यार्थ्यांचे काढले जाणारे सेल्फी यामुळे विद्यार्थी खुश झाले.
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. शाळेच्या प्रांगणात रंगीबेरंगी फुले,फळे स्वागत फलक आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत समन्वयिका जयश्री कुंजीर यांनी केले व त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छाही दिल्या.
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये विविध गमतीशीर खेळ, बौद्धिक कोडी, तसेच त्यांच्या उत्सुकते ला चालना देणारे शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात करता आली.
शिक्षकांनीही मेहनत घेऊन विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आणि समावेशक उपक्रम राबवण्यावर भर दिला. तसेच वर्ग व वर्गाबाहेरील फलकांचे सुशोभीकरण करून एक प्रेरणादायी वातावरण निर्माण केले.या शुभारंभ प्रसंगी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ही विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांचे हसत खेळत स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये नवीन जोम व उत्साह पहायला मिळाला.
शिक्षणाला आनंदाची जोड देत विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल,कांदळी यांचे हे सकारात्मक व अभिनव प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहेत.