मन हेलवणारी घटना: स्विमिंग टॅंक मध्ये बुडून बाप लेकाचा मृत्यू

1 min read

जांबुत दि.१ :- जांबुत (ता शिरूर) येथील बापलेकाचा स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चांगरबाबा कृषी पर्यटन केंद्रामधे कृषी केंद्राच्या मालकाच्या मुलाचा आणि नातवाचा स्विमिंग टँक मधे बुडून मृत्यु झाला. तर त्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेली चिमुकल्याची आई सुदैवाने वेळेत मदत मिळाल्याने वाचली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सत्यवान शिवाजी गाजरे व दीड वर्षाचा मुलगा राजवंश या दोघांचा मृत्यु झाला. बेल्हे जेजुरी महामार्गावर जांबुत ( पंचतळे ) येथे शिवाजी गाजरे यांचे हॉटेल व कृषी पर्यटन केंद्र आहे. रविवारी ३० मे रोजी सांयकाळी ४ च्या सुमारास येथे त्यांचा मुलगा सत्यवान शिवाजी गाजरे ( वय 28) सुन स्नेहल सत्यवान गाजरे ( वय 25 ) तसेच नातु राजवंश ( वय दीड वर्षे ) हे हॉटेल परीसरातच होते. येथे परीसरात स्विमिंग टॅक असुन सुन व मुलगा कामात असताना राजवंश खेळत खेळत स्विमिंग टँक मधे जाऊन टाकीत पडला.

राजहंसला वाचविण्यासाठी सत्यवान यांनी टँककडे धावत जाऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्यवान यांनाही पोहता येत नव्हते, त्यामुळे तेही बुडू लागले. त्यावेळी सत्यवान यांची पत्नी स्नेहलनेही पाण्यात उडी मारली. मात्र स्नेहललाही पोहता येत नसल्यांने ती सुद्धा पाण्यात बुडू लागली. सत्यवानचा भाऊ किरण येथील आरडा ओरडा ऐकू आल्याने धावत गेला. यावेळी त्याला स्नेहला वाचविण्यात यश आले. मात्र भाऊ आणि भावाच्या मुलाला वाचवण्यात यश आले नाही. सत्यवान व राजवंशला त्यांनी वर काढुन तत्काळ जांबुत येथे खाजगी दवाखाण्यात नेले.

तिथून दोघांनाही आळे येथे नेले. मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यु झाला होता. या दुःखद घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेबाबत माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती देवदत्त निकम, डॉ. सुभाष पोकळे, दामू घोडे, सावित्रा थोरात आदींनी शोक व्यक्त केला. मयतांचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात जांबूत (ता. शिरूर) येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे