पिकअप व टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात आयशर टेम्पो जाळला; डिझेल ची टाकी फुटल्याने लागली आग

1 min read

आळेफाटा दि.२३: नाशिक-पुणे महामार्गावर आळेफाटा (ता.जुन्नर) येथे आयशर ट्रक व पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने ट्रकला भीषण आग लागली. ज्यामध्ये आयशर पूर्णपणे जळून खाक झाला.

ही घटना रविवार (दि.२३) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की,पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे रविवारी मध्यरात्री एक मालवाहू आयशर ट्रक हा नाशिकच्या दिशेने जात होता. यावेळी समोरून येणारा मालवाहतूक पिकअप त्यावर येऊन आदळला. अपघात इतका भयानक होता की एकमेकाच्या विरुद्ध दिशेने हे ट्रक जाऊन पडले.

या भीषण अपघातात आयशर ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणाच्या आत ट्रक आगीत भस्मसात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. हा अपघात आळेफाट्याच्या नजीक कलासागर समोर झाला. या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी योग्यत्या सूचना दिल्या.

आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाली. मागील काळात मालवाहतूक वाहनांना आग लागण्याच्या घटना लक्षात घेता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशानाही या वाहतूककोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे