मोठी बातमी! म्यानमार थायलंड मध्ये भूकंप; अनेक इमारती कोसळल्या
1 min read
दिल्ली दि.२८:- म्यानमारमध्ये आज शुक्रवारी सकाळी 11.50 वा. सुमारास एक मोठा भूकंप झाला असून, तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 7.2 मापली गेली, तर काही अहवालांमध्ये ती 7.7 रिक्टर स्केलवर पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या सागाइंग प्रांतात होता, जो जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपाचे झटके म्यानमारसह थायलंडच्या राजधानी बँकॉकपर्यंत जाणवले असून, या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
म्यानमारच्या मांडले शहरात इरावदी नदीवरील प्रसिद्ध ‘एवा ब्रिज’ कोसळल्याची माहिती आहे, ज्यामुळे स्थानिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. थायलंडमध्येही बँकॉकमधील अनेक गगनचुंबी इमारतींना तडे गेल्याचे आणि काही ठिकाणी इमारती झुकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्राथमिक अहवालांनुसार, म्यानमारमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. थायलंडमधील बँकॉक येथील एक टॉवर कोसळल्याने अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.
अद्याप अधिकृतपणे मृत्यू आणि जखमींची संख्या जाहीर झालेली नाही, परंतु स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.