महिलेने दिला चक्क तीन बाळांना जन्म

1 min read

रोहा दि.२२:- आपल्या अवती-भोवती निसर्गाचे अनेक अविष्कार आपण पाहिलेले आहेत. आपण संपूर्ण आयुष्यात एखाद्या गोष्टीचा विचार केलेला नसतो, पण तीच गोष्ट आपल्यासोबत घडते. काही गोष्टी तर अगदी चमत्कारिक वाटतात. कधीकधी तर विज्ञानालाही विचार करायला लावणारे अविष्कार आपल्या आजूबाजूला घडतात. सध्या रोहा तालुक्यातील पहूर या गावात असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे अवघ्या 23 वर्षांच्या महिलेने चक्क एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला आहे.मातृत्व हे महिलेला दिलेलं सर्वांत अमूल्य असं देणं आहे, असं आपण मानतो. मात्र काही-काही महिलांना बाळासाठी अक्षरश: तरसावं लागतं. रोहा तालुक्यातील पहूर या गावातील मनीषा अक्षय काटकर या महिलेसोबत मात्र उलटं घडलं आहे. या महिलेने एकाच वेळी एक किंवा दोन नव्हे तर तीन बाळांना जन्म दिला आहे. विशेष बाब म्हणजे हे तिन्ही बाळं अगदी सुरक्षित असून त्यांची प्रकृतीही चांगली आहे.या महिलेची प्रसूती रायगड जिल्ह्यातील माणगाव उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. 23 वर्षांच्या या महिलेची प्रसूती करताना योग्य त्या सर्व बाबींची खबरदारी घेण्यात आली होती. ही प्रसूती करणे तसे जिकरीचे काम होते. मात्र डॉक्टरांनी त्यांचे सर्व ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून ही प्रसूती यशस्वी करून दाखवली. सध्या प्रसूत महिला आणि तिचे तीन बाळ सुखरुप आहेत. दरम्यान, ही प्रसूती यशस्वीरित्या केल्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रसूत झालेल्या महिलेचेही या निमित्ताने अभिनंदन केले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे