आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ:- उपमुख्यमंत्री अजित पवार
1 min read
मुंबई दि.२१:- विधानसभा निवडणुकींच्याआधी महायुती सरकारकडून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणण्यात आली. याअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हफ्ता देण्यात आला. निवडणुकीनंतर 2100 रुपयांचा हफ्ता देण्यात येण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण हे आश्वासन पूर्ण न केल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. 8 मार्चला महिलादिनी 2100 रुपयांचा हफ्ता देऊन सरकार आश्चर्याचा धक्का देईल, अशी आशा महिलांना होती. पण त्यांची निराशा झाली.
आता 2100 रुपयांचा हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं आम्ही नाही म्हटलं नाही.
आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. सर्व सोंग करता येतात मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपयांचा हफ्ता देऊ, असे ते पुढे म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार म्हणाले, आम्ही असं म्हटलं नाही, की आम्ही २,१०० रुपये देणार नाही. आम्ही ते देणार आहोत, आर्थिक परिस्थिती बघून आम्ही पैसे देऊ. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्या पद्धतीने आमचं काम सुरु आहे.
आमच्या लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देणार आहोत. सध्या आम्ही कबूल केल्याप्रमाणे १,५०० रुपये देतोय. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही २,१०० रुपये देऊ. असे ते म्हणाले.राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ,
असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. तेव्हा अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतात, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते.
10 मार्च रोजी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सभागृहात निवेदन सादर करताना उपरोक्त माहिती दिली.