मतदान कार्ड -आधारशी लिंक करण्याच्या शासनाच्या हालचालींना वेग
1 min read
नवी दिल्ली दि. १६:- मतदार यादीत फेरफार केल्याच्या आरोपांदरम्यान, मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मंगळवारी केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव आणि भारतीय विशिष्ट
ओळख प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा करतील. डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांच्या मुद्यावरून संसदेत अलिकडेच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात येत आहे.
डुप्लिकेट मतदार कार्ड क्रमांकांवरून संसदेत आणि बाहेर मोठा गोंधळ सुरू आहे. तसेच या माध्यमातून राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता.
गेल्या शुक्रवारी, निवडणूक आयोगाने सांगितले होते की ते पुढील तीन महिन्यांत डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रमांकांची दशकांपासूनची समस्या सोडवेल.
लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २३ नुसार, निवडणूक नोंदणी अधिकारी विद्यमान किंवा संभाव्य मतदारांना स्वेच्छेने ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांक प्रदान करण्याची आवश्यकता असू शकते. या कायद्यानुसार मतदार याद्या स्वेच्छेने आधार डेटाबेसशी जोडण्याची परवानगी आहे.
सरकारनेही या मुद्यावर म्हटले आहे की, आधार मतदार कार्ड सीडिंग प्रक्रिया सुरु आहे आणि प्रस्तावित लिंकिंगसाठी कोणतेही लक्ष्य किंवा वेळ निश्चित केलेली नाही. याशिवाय, ज्यांनी त्यांचे आधार तपशील मतदार यादीशी जोडले नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत.