जागतिक महिला दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात ‘अफार्म’तर्फे कृषि मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन
1 min read
जुन्नर दि.१३:-जागतिक महिला दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात अफार्मने नुकताच महिला शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. Indigo CSR अनुदानित व अफार्म, पुणे संचलित ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प-टप्पा २ अंतर्गत ‘अल्पखर्चिक सेंद्रिय शेती तंत्रज्ञान’ मार्गदर्शन सत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. जुन्नर तालुक्यातील इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु. या गावांत सन २०२४ ते २०२७ या कालावधीमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. इंगळून, ता. जुन्नर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त महिला, मुली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी हक्कदर्शिका म्हणून काम करत असलेल्या नयना उघडे (घंगाळदरे) आणि प्रेरणासखी म्हणून काम करत असलेल्या स्वाती घोरपडे (खानगाव) या लाभार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अफार्म-इंडिगो प्रकल्पामुळे महिलांची चूल-मूल ही मानसिकता बदलत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे महिलांची उद्योजगतेची मानसिकता घडत असल्याचे या दोन्ही महिलांच्या मनोगतातून समोर आले.डॉ. सुधा कोठारी, अध्यक्ष-चैतन्य संस्था, खेड आणि कार्यकारी समिती सदस्य, अफार्म या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या.
त्या म्हणाल्या, “महिला शेतकरी तसेच महिला ग्रामसंघ, महिला उत्पादक गट यांनी गेल्या काही वर्षांत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. महिलांच्या विविध स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणासाठी अफार्मच्या या प्रकल्पाने मोठा हातभार लावला आहे.
स्थानिक पातळीवरील लोकांचा पाठींबा, इच्छशक्ती तसेच आपले नियोजन कौशल्य याविषयी प्रचंड उपयोगाला येते याची या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे आहे.”निवेदिता शेटे (शास्त्रज्ञ-कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव) या म्हणाल्या, “महिला सक्षमीकरणात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सबलीकरण हे सर्व येते.
प्रत्येक महिलेला जर तिच्या अंगभूत कलागुणांची जाणीव जर झाली तर त्याचा व्यावसायिक अंगाने उपयोग नक्कीच करता येईल. त्यासाठी आपल्याला संवाद साधण्याचे, माहिती देण्याचे कौशल्य नक्कीच आत्मसात करावे लागेल. निरोगी जीवनासाठी प्रत्येक महिलेने एक गुंठ्याची का होईना पोषण बाग विकसित करावी.
आणि त्यामार्गे आपल्या शरीरातील पोषकमूल्ये जर कमी असतील तर त्यावर सुद्धा लक्ष देऊन आपली पोषक शक्ती वाढवावी लागेल. पोषणबागेमुळे आजारपण कमी होते आणि बचत सुद्धा होते.”मनीषा घोगरे, (समुपदेशक जुन्नर पोलीस स्थानक)यांनी ग्रामीण भागात आत्महत्या, बालविवाह,
विविध गंभीर आजार, तसेच लहान-तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे याबद्दल चिंता व्यक्त केली. या सर्व समस्यांबरोबरच मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रगतीशील शेतकरी उत्तम जाधव यांनी सेंद्रिय शेतीवर उत्तम सादरीकरण केले.
वेगवेगळ्या स्थानिक वनस्पती उदा. कडुनिंब, सीताफळ, धोत्रा, गुळवेल, करंज, बेलफळ यासह अनेक सेंद्रिय नैसर्गिक वस्तूंचा वापर करून कीटकनाशके कशी तयार करता येतील यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन करून उपयुक्त सूचना दिल्या. आजच्या काळात कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सेंद्रिय अन्नाचा वापर आपल्या आहारात वाढवणे.
अत्यंत गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. सेंद्रिय शेतीमुळे शेतमालाची उत्पादकता वाढते तसेच मातीची सुपीकता वाढते हे त्यांनी समजावून सांगितले.यावेळी डॉ. सुनिल भंडलकर (पशूधन विकास अधिकारी, जुन्नर), अनंता मस्करे (IBFM-प्रमुख, चैतन्य संस्था),
इंगळूनच्या महिला सरपंच तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि महिला ग्रामसंघ समिती (इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु.) हे सर्व उपस्थित होते. यावेळी येथे झालेल्या प्रदर्शनात शिवली, भिवाडे, इंगनूळ, आळेफाटा येथून या ठिकाणी महिला उद्योजगांचे धान्य-तांदूळ,
वॉलपीस, कपडे, कोंबडी-गावरान अंडे, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, जनावरांचे औषधे बद्दल स्टॉल मांडण्यात आले होते. अफार्मचे सावता दुधाळ (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर हनुमंत दुधाने यांनी आभार प्रदर्शन केले. ओंकार फरतारे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष मेहनत घेतली.