माझा प्राण तुमच्यामध्ये आहे- उध्दव ठाकरे
1 min read
मुंबई दि.१०:- माझं काही तरी मुख्यमंत्री पद गेलं, अरे मी सोडून दिलं ते. कुठेही माझा जीव जळला नाही, कारण माझा प्राण वर्षा बंगल्यामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कट्टर शिवसैनिक दुर्दैवाने आपल्यापासून जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो. तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही, म्हणून मला काय आनंद होतो, अशातला भाग नाहीये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ईशान्य मुंबई पदाधिकारी निर्धार शिबीरात उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबई पदाधिकारी निर्धार मेळाव्यातून मुंबई आपल्याला जिंकायचीच आहे म्हणत महापालिका निवडणुकीचं रणशिंगच फुंकलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर जोरदार टीका केली. माझे आजोबा म्हणायचे, दगडाला शेंदूर लावला तर तो देव, नाही तर धोंडा आहे. आम्ही धोंडा आहोतच. जो कुणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याचा कपाळमोक्ष करण्याची ताकद आमच्या या सर्व मराठी मनामध्ये आहे. आपण दगड बणून या सर्वांना सामोरे जायला हवे. असे उध्दव ठाकरे म्हणाले. एवढेच नाही तर, मला नेमकं ते कळत नाहीये,
अरे तुम्हाला कळतय का की, तुम्ही कोणाची हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय? असा प्रश्नही यावेळी त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले कि, इतकी वर्षे आपण ज्यांना डोक्यावर घेऊन दिल्ली दाखवली, दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी २०१४ ला लोकसभा जिंकली त्यांनी
(भाजपने) आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो? मग काय केलं होतं आपण असं पाप? एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे की, तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी दिली होती की, आता ही युती तोडा. म्हणजे “गरज सरो वैद्य मरो”. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो.
का? कारण हिंदुत्व? मग १९ साली पुन्हा ते अमित शहा वगैरे घरी आले, त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली, त्याच्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा आपलं सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असेही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.