न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत फायनलमध्ये केला दिमाखात प्रवेश

1 min read

लाहोर दि.६:- न्यूझीलंडने क्रिकेट विश्वातील आपला दरारा कायम राखत अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली आहे. न्यूझीलंडचा फायनलमध्ये सामना आता भारताशी होणार आहे. न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय साकारला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३६२ धावांचा डोंगर उभारला होता. पण या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर न्यूझीलंडने अंकुश लावला आणि हा ५० धावांनी सामना जिंकला. डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकांत तुफानी फटकेबाजी करत. नाबाद १०० धावांची खेळी साकारली खरी, पण तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ पराभवाच्या वाटेवर निघालेला होता. न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला तो रचिन रवींद्र आणि केन विल्यम्सन यांनी. कारण या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागदारी रचली आणि संघाला सहजपणे २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. राचिनने सुरुवातीला आक्रमक खेळ करत जोरदार फटकेबाजी केली आणि प्रथम शतक झळकावले.पण शतक झळकावल्यावर तो जास्त काळ टिकू शकला नाही.राचिन रवींद्रने यावेळी १३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०८ धावांची खेळी साकारली. राचिन बाद झाला आणि त्यानंतर केनने आपल्या खांद्यावर संघाची सर्व जबाबदारी उचलली. केनच्या खेळात यावेळी चांगलीच आक्रमकता दिसली. केननेही यावेळी आपले शतक साजरे केले. पण तोदेखील त्यानंतर जास्त धावा करू शकला नाही. केनने यावेळी ९४ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०२ धावा केल्या. डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स यांनी अखेरच्या षटकांमध्ये धमाकेदार फटकेबाजी केली आणि त्यामुळेच न्यूझीलंडला ३६२ धावांचा पल्ला गाठता आला. न्यूझीलंडच्या ३६३ धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात संथ झाली. पण त्यानंतर कर्णधार तेंबा बवुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण टेंबा बाद झाल्यार ही जोडी फुटली, त्यानंतर डुसेनही लवकर बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पिछाडीवर ढकलला गेला. बवुमाने यावेळी ५६ आणि डुसेनने ६९ धावा केल्या. डेव्हिड मिलरनंही शेवटच्या ओव्हर्समध्ये प्रतिकार केला. पण, त्याचे हे प्रयत्न अपुरे ठरले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे