भारत-न्यूझीलंड यांच्यात आज रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचा महामुकाबला

1 min read

दुबई दि.९:- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद मिळवण्यापासून टीम इंडिया फक्त एक सामना दूर आहे. दुबईत आज रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये भारताची लढत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडच्या टीमनं यापूर्वी टीम इंडियाला धक्के दिले आहेत. मिचेल सँटनरच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी ही टीम चांगलीच फॉर्मात असून त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय टीम करणार नाही.भारत विरुद्ध न्यूझीलंड ही चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाला बारा वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आजच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर न्यूझीलंडच्या टीमला लीग मॅचमध्येच भारताकडून पराभव पत्कारावा लागला आहे. सन २००० मध्ये या दोन्ही देशांमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचाच सामना पार पडला होता. त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता भारत २५ वर्षांनी हिशोब चुकता करणार का? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्या संघाला 2.24 दशलक्ष डॉलर्स (सुमारे २० कोटी रुपये) मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस पडेल. उपविजेत्या संघाला 1.24 दशलक्ष डॉलर्स (9.74 कोटी रुपये) मिळतील. यंदा भारतासमोर एक सुवर्णसंधी आहे. जर भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभूत केले तर चॅम्पियन्स ट्रॉफी व्यतिरिक्त त्यांना सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. जर भारत अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून हरला आणि उपविजेता संघ बनला तर भारताला ट्रॉफी गमवावी लागेल आणि 9.74 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे