धनंजय मुंडे यांचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्विकारला

1 min read

मुंबई दि.४:- संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि गँगवर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप सातत्याने होत होता. संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे नेते उपस्थित होते.संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखतील, असा इशारा आज विरोधकांनी दिला होता. अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, मी तो राजीनामा स्वीकारला आहे आणि तो राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे