धनंजय मुंडे यांचा राजीनामा; घडामोडींना वेग
1 min read
मुंबई दि.४:- संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामध्येच आता संतोष देशमुख यांच्या हत्येवेळचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो बघितल्यानंतर अंगावर काटा येतो. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. एवढेच नाही तर व्हायरल झालेल्या फोटोंनंतर देवगिरी बंगल्यावर एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवगिरी बंगल्यावर पोहोचले.
या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे उपस्थित होते.या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चा झाल्याचे सांगितले जातंय. सुरूवातीपासूनच धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
मात्र, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप आहेत. सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हा या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. खंडणीतूनच ही हत्या झाल्याचेही सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्हायरल होणाऱ्या फोटोंबद्दल बोलताना म्हटले की, मी या फोटोंबद्दल काहीच बोलू शकत नाही. माझी एकच विनंती आहे की, हे फोटो डिलीट करा.फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगला पोहोचले आहेत.
मनोज जरांगे यांना बघताच धनंजय देशमुख हे ढसाढसा रडताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. आईपुढे जाण्याची किंमत होत नसल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे व्हायरल होणारे फोटो पाहून सर्वजण सुन्न झाल्याचे चित्र आहे.
अत्यंत क्रुरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलीये. अंगावरील कपडे फाडून आरोपींनी मारहाण केली. हेच नाही तर ज्यावेळी ही मारहाण सुरू होती, त्यावेळी आरोपी हसताना देखील दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर चाैकशीत आहेत.