राज्यातील सर्व शाळांना उद्या पासून उन्हाळी सुट्टी; वाढत्या तापमानामुळे शासनाचा निर्णय

1 min read

मुंबई दि.२०:- उन्हाचा पारा प्रचंड प्रमाणात वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान काही दिवसांपासून अक्षरशः 42 अंशावर गेले आहे.

दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वांधिक असल्यानं घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिल म्हणजे उद्यापासून सुट्टी जाहीर करण्याचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. नववी आणि दहावीच्या मुलांशिवाय इतर कुठल्याही वर्गातील विद्यार्थ्यांनासाठी इतर उपक्रम घेता येणार नाहीत.

तसेच सुट्टीच्या काळात मुलांवर अभ्यासाचा फार बोजा ठेवता येणार नाही. मुलांना इतर कार्यक्रम खासगी संस्थांमार्फत करायचे असतील तर ते करु शकतात पण उन्हाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असंही आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे