मानकरवाडीत एका रात्रीत पाच घरफोड्या; शेजारील घरांची बाहेरून कडी लावून केली चोरी

1 min read

इंदापूर दि.२४:- इंदापूर तालुक्यातील मानकरवाडी येथे एका रात्रीत चोरट्यांनी पाच ठिकाणी घरपोडी करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच, चोरट्यांनी घरात झोपलेल्या ग्रामस्थांच्या तोंडावर बेशुद्ध करणारा स्प्रे मारला. ही घटना शनिवारी (दि. २२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.चोरट्यांनी मानकरवाडीतील राजेंद्र निकम, हरिदास यादव, दादासो कणसे, विजय कणसे व अमित कणसे या पाच जणांच्या घरी घरफोडी केली. शनिवारी मध्यरात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी राजेंद्र निकम यांच्या देवघराचे कुलूप कटावणीच्या साहाय्याने तोडून देवघरात प्रवेश केला. परंतु, तेथे काही सापडले नाही. त्यानंतर चोरट्यांनी हरिदास यादव यांच्या घराचा दरवाजा कटावणीने उघडून कपाटातील रोख ३५ हजार रुपये व सोन्याचे दागिने चोरून नेले. हरिदास यादव हे एका खासगी कारखान्यात नोकरी करतात. ते मध्यरात्री तीनच्या सुमारास घरी आले असता, त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे दिसून आले.यानंतर चोरट्यांनी दादासो कणसे यांच्या देवघराचे कुलूप तोडून देवघरात प्रवेश केला. मात्र, या ठिकाणी चोरट्यांना काही सापडले नाही. त्यानंतर विजय कणसे यांची ग्रे रंगाची शाईन दुचाकी (एमएच ४२ एडी ३११) चोरट्यांनी चोरून नेली. तसेच, सणसर-कुरवली रस्त्यालगत अमित मानकर यांच्या घराचा दरवाजा चोरट्यांनी कटावणीने तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये झोपलेल्या सर्व सदस्यांच्या तोंडावर बेशुद्ध करणारा स्प्रे मारला. त्यांच्या घरातून चोरट्यांनी पाच ते सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ७० ते ८० हजार रुपये रोख रक्कम चोरली. चोरटे घराच्या मागील दरवाजाने पसार झाले. दरम्यान, चोरी करताना चोरट्यांनी शेजारच्या इतर ग्रामस्थांच्या घरांची बाहेरून कडी लावली. त्यामुळे या ग्रामस्थांना घरातून बाहेर येता आले नाही. ग्रामस्थांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये चोरीची माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे