सुरेश धस- धनंजय मुंडे यांची गुप्तभेटीने बीड प्रकरणात ट्विस्ट !

बीड, दि. १४ – एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंविरोधात आवाज उठवत असतानाच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे सुरेश धस यांनी सांगितले. या भेटीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील शिक्कामोर्तब केले.गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे.
या हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आवाज उठवला आहे. देशमुख हत्या प्रकरण आणि बीडचा बिहार करण्यामागे आका म्हणजेच धनंजय मुंडेंचाच हात आहे, अशी थेट भूमिका ते घेत आहेत तसेच या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे करत धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र आता त्याच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेची भेट घेतल्याचे समोर आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा करताना माझी, सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. आमची जवळपास ३ तास चर्चा केली, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर सुरेश धस यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी माझी आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. मी दिवसा त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे, त्यामुळे त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, त्यामध्ये काही गैर नाही. मात्र, या संतोष देशमुख हत्येचा लढा सुरूच राहणार आहे. अगदी फाशी होईपर्यंत मी आवाज उठवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.