कर्जाच्या आमिषाने फसवणूक; दोघे आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात
1 min read
बेल्हे दि.१५:- दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनेत वाढ होत असून जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील काहींची फसवणूक झाली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की,
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, गोठा अशा योजनांसाठी २५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात शशिकांत नामदेव कुऱ्हाडे (रा. आळे) व भाऊसाहेब नाना बोरचटे (रा. बेल्हे, ता. जुन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय विलास पिंगट यांनी आळेफाटा ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, २५ ऑक्टोबर २०२४ रोजी कुऱ्हाडे, बोरचटे यांनी महामंडळात कामाला असून, शेतकऱ्यांना २५ लाख रुपये कर्ज प्रकरण मंजूर करून देतो, असे आमिष दाखविले. कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ४ लाख ९८ हजार ९०० रुपये घेतले. कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली.
तसेच सुनीता रमेश बांगर, कविता किशोर तांबे, सारिका सचिन बोरचटे, वंदना भास्कर नरवडे, सुवर्णा ईश्वर पिंगट, कविता सुभाश बोरचटे आदींची फसवणूक केली.
पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी घरातच महामंडळ योजनेचे कार्यालय थाटत शेतकऱ्यांकडून मोठी रक्कम उकळल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आळेफाटा पोलिसांनी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
आरोपींनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना दी नॅशनल को-ऑप. बँकेच्या एफडी पावत्या दिल्या. शेतकऱ्यांनी मुंबईला जाऊन चौकशी केली असता अशा नावाची बँक अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले.