नळवणे येथे खंडोबाच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना; दोन दिवस धार्मिक कार्यक्रम
1 min read
आणे दि.८:- नळवणे (ता.जुन्नर) येथील श्री कुलस्वामी खंडेराय देवाच्या मंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यानिमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.९) सकाळी श्री कुलस्वामी खंडेराया, म्हाळसादेवी, बानाई देवी, दोन अश्व, गोमाता व कासव या नवीन मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर गणेशपूजन, मातृकापूजन, पुण्याहवाचन आदी धार्मिक विधी होणार आहेत. सोमवारी (दि.१०) सकाळी रूद्र स्वाहाकार यज्ञ संपन्न झाल्यानंतर दुपारी एक वाजता स्वामी अनंत महाराज घोष (मौनी बाबा) व हभप. तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभ हस्ते सर्व मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
त्यानंतर बाल कीर्तनकार हभप. माऊली महाराज यांचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे.श्री खंडोबा देवाच्या जुन्या मूर्ती सुमारे चारशे वर्षांपूर्वी बसविल्या असून खूपच जीर्ण झालेल्या होत्या. त्यामुळे नवीन तशाच मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे.
अठरा वर्षांपूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून प.पू. गगनगिरी महाराजांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले होते.अशी माहिती कुलस्वामी खंडेराया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.