उसाला पाणी देत असताना अंगावर वीज पडल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; दीड महिन्यापूर्वी झाला होता विवाह

1 min read

लोणी काळभोर दि.१७:- लोणी काळभोर (ता. हवेली) येथे शनिवारी (दि.१५) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेतात उसाला पाणी देत असताना अंगावर वीज पडल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दीपक दशरथ काळभोर (वय २९, रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. दीड महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

दीपक काळभोर हा शेतात उसाच्या पिकाला पाणी देत होता. अचानकपणे त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत दीपक शेतातून घरी न आल्याने कुटुंबीय त्याच्या शोधात शेतात गेले. या वेळी दीपक हा जमिनीवर पडल्याचे दिसून आले. त्याला तत्काळ लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड तपास करीत आहेत. दीपक याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे