ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात एच एस सी परीक्षेचे प्रशिक्षण पूर्ण

1 min read

आळेफाटा दि.८:- ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या 12 वी बोर्ड परीक्षेच्या नियोजनाची बैठक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण पार पडले व बैठकीत परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी व उपप्राचार्य सुरेश कुऱ्हाडे यांनी सांगितले. आळे केंद्र क्रमांक 0184 येथे एकूण विद्यार्थी 866 परीक्षार्थी म्हणून परीक्षा देणार आहेत. सदर केंद्रावर ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे शाळेचे 580 विद्यार्थी, विद्या विकास मंदिर राजुरी शाळेचे 128 विद्यार्थी, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल आळे शाळेचे 49 विद्यार्थी, जे. आर. इंग्लिश मीडियम स्कूल शाळेचे 47 विद्यार्थी, सद्गुरु सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार शाळेचे 40 विद्यार्थी आणि विद्यानिकेतन साकोरी शाळेचे 22 विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत. केंद्र संचालक म्हणून राजेंद्र भालेराव, उपकेंद्र संचालक लांडगे मच्छिंद्र, खतोडे बाबासाहेब, सुनिता दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॉपीमुक्त, शांततेत, कडक व शिस्तप्रिय वातावरणात परीक्षा पार पाडणे ही या केंद्राची पहिल्यापासूनच ओळख आहे. त्यासाठीच कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत जनजागृती सप्ताह महाविद्यालयात नुकताच आयोजित करण्यात आला होता.परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी यावर्षी मंडळाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात टेलिफोन, फॅक्स केंद्र, झेरॉक्स सेंटर, ई-मेल- इंटरनेट सुविधा, लॅपटॉप- मोबाईल प्रसारमाध्यमे अथवा इतर संपर्क साधने बंद ठेवणे बंधनकारक आहे. परीक्षा काळात सदर परिसरात कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला प्रवेश निषिद्ध असेल. सदरचे आदेश न पाळणाऱ्या व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 223 प्रमाणे कार्यवाही करण्यात येऊ शकते. याशिवाय या वर्षी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनची नजर असणार असून परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करणारे, त्याला प्रवृत्व करणारे, मदत करणारे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार असून. केंद्रापासून 500 मी अंतराच्या परिसरात कलम 144 लागू केले जाणार आहे. संपूर्ण परिक्षा केंद्रावर सी सी टी व्ही ची नजर असणार आहे. कक्षेत असणार आहे अशी माहिती प्राचार्य संदीप भवारी यांनी दिली व झालेल्या आढावा बैठकीत परीक्षेच्या कामकाजाचा आढावा घेऊन पर्यवेक्षकानी कोणती काळजी घ्यायची याची माहिती दिली. यावेळी परीक्षेसंबंधी सर्व काम पूर्ण झाल्याचे आढळून आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संदीप भवारी होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य सुरेश कुऱ्हाडे यांनी केले तर आभार परीक्षा उपकेंद्र संचालक बाबासाहेब खतोडे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे