राजुरीतील बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार; बंदिस्त गोठ्याची जाळी वाकवून बिबट्याचा आतमध्ये प्रवेश
1 min read
राजुरी, दि.८:- जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचे हल्ले काही थांबता थांबेना राजुरी येथील शेतकरी शहानवाज पटेल यांच्या सात शेळ्या जागीच ठार झाल्या आहे. शुक्रवारी (दि.७) राजुरी येथील तागडामळा शिवरातील शहानवाज युसूफ पटेल यांच्या घरासमोरील असलेल्या बंदिस्त गोठ्याची जाळी वाकवून आतमध्ये प्रवेश केला. गोठ्यातील पाच गाभण शेळ्या, दोन मोठे बोकड जागीच ठार केले. पटेल यांनी सकाळी गोठ्याचा दरवाजा उघडून पाहिला तर गोठ्यामध्ये सात शेळ्या मृतावस्थेत आढळल्या त्यानंतर गोठ्याकडे वरती पाहिले तर गोठ्याची जाळी वाकून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
त्यानंतर घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी वनपाल अनिल, वनरक्षक त्रिंबक जगताप, स्वप्निल हाडवळे दाखल झाले, त्यांनी घडलेल्याघटनेची माहिती घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्यांचा पंचनामा केला.घटनास्थळी युवानेते वल्लभ शेळके, शाकीर चौगुले, निलेश हाडवळे, रंगनाथ औटी यांनी भेट दिली. दरम्यानच्या काळात मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहे. वनविभागाने तातडीने पंचनामा करून लवकरच शेतकऱ्याला शासकीय मदत मिळाली पाहिजे. तसेच बिबट्याच्या हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वल्लभ शेळके यांनी केली.