“समर्थ” मध्ये शिकवले जाणारे जीवनशास्त्र आणि चरित्रकला महत्वाची:- नितीन बानगुडे पाटील

1 min read

बेल्हे दि.६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आयोजित “समर्थ युवा महोत्सव २०२५” नुकताच मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व प्रेरणादायी वक्ते प्रा.नितीनजी बानगुडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या युवा महोत्सवाची सुरुवात शोभायात्रा व ग्रंथ दिंडीने करण्यात आली. हातामध्ये वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकोबा या नावाचा जयघोष करत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई ची पालखी फुलांनी सजवली होती.पालखीमध्ये विविध प्रकारच्या ग्रंथसंपदा ठेवून ग्रंथदिंडी मध्ये संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई निवृत्तीनाथ, एकनाथ, नामदेव, तुकाराम आदि संतांच्या वेशभूषा करून विठ्ठल रखुमाई सहित वारकरी पायी दिंडी सोहळा दाखवण्यात आला. डोक्यावर तुळस, हातामध्ये टाळ व मृदुंग घेऊन, मुखाने हरीनामाचा जयघोष करत विठूमाऊलीचा गजर करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या पालखीचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून युवा महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन बानगुडे म्हणाले की, यशाला शॉर्टकट नसतो. कष्टाला पर्याय नाही. यश मिळवण्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची असते. मला अभिमान या गोष्टीचा आहे की, समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये माणूस घडवण्याचं शिक्षण दिलं जातं. इथं जीवनशास्त्र आणि चरित्रकला शिकवली जाते.
हा युवा महोत्सव म्हणजे चैतन्याचा, प्रेरणेचा, संस्काराचा, विचारांचा आणि आचारांचा आविष्कार म्हणून गेली काही वर्ष इथं साकारला जातोय असे प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील म्हणाले. जगात कुणीच तुम्हाला पराभूत करू शकत नाही फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता त्याचप्रमाणे जगात कोणीही तुम्हाला विजयी बनवू शकत नाही. तुम्हीच तुमचा विजय मिळवू शकता. तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करू शकता ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. तुमच्या मना इतकं दुसरं सामर्थ्यशाली काहीच नाही.
प्रेम करायचं झालं तर स्वतःच्या ध्येयावर करा म्हणजे दुनिया तुमच्यावर प्रेम करायला लागेल. भावनांची व्यर्थ गुंतवणूक करू नका असा मोलाचा सल्ला यावेळी नितीन बानगुडे पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. अशक्य असं काहीच नाही फक्त विश्वास असायला हवा. यावेळी नितीन बानगुडे पाटील यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, सर्व विभागाचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी तर आभार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे