फेब्रुवारीत उन्हाच्या झळा; विदर्भ, मराठवाडा तापला; राज्यात उकाड्याने नागरिक हैराण

1 min read

पुणे दि.५:- राज्यात सध्या तापमानात मोठा बदल पाहायला मिळत आहे थंडीचा महिना असतांना देखील फेब्रुवारीत उन्हाच्या झळा नागरिक अनुभवत आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तापमान हे ३५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सध्या राज्यात कोरडे वारे वाहत असून पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सकाळी आणि रात्रीच्या थंडीचे प्रमाण देखील कमी झाले असून नागरिक उकड्याने हैराण झाले आहेत.पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कमाल तापमानाचा आकडा वाढत आहे. तर किमान तापमानातही वाढ होत आहे. विदर्भात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत पारा पोहोचला आहे. कोकणातील रत्नागिरी इथं पारा ३५ च्या पुढे होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात आता उष्णतेच्या झळा नागरिक अनुभवत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रासह मुंबई शहर व उपनगरांमध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे गर्मी अधिक जाणवणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह राजस्थान व त्यालगत मध्य पाकिस्तान भागात सक्रिय असून पश्चिमी चक्रावात वायव्ये दिशेला राहणार आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे.राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात तापमानात कमी जास्त असा चढउतार नागरिक अनुभवणार आहेत. सध्या राज्यातून थंडी हद्दपार झाली आहे. उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. विदर्भ व मराठवाड्यात तर नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात सकाळी व रात्री गारठा तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने नागरिक घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात विदर्भ व मराठवाड्यात सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेले आहे. विदर्भ व मराठवाड्यात ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान व आर्द्रता देखील वाढली आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. तर सकाळी गारठा कायम आहे. तर मुंबई व कोकणात आद्रता वाढली असून यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे