आष्टी तालुक्यात आभाळ फाटले; दोन ते तीन फूट गारांचा थर

1 min read

आष्टी दि.१६:- आष्टी (जि.बीड) तालुक्यातील अरणविहिरा परिसरात शनिवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्याने रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिसरात तब्बल तीन फूट उंचीचा गारांचा थर जमा झाला होता. तालुक्यातील अरणविहिरा, तागड खेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल, कारखेल, म्हसोबावाडी, चिंचेवाडीसह परिसरात गारांचा वर्षाव झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे वाहत आहेत. त्यातच शनिवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपिटीचा फटका रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. त्यासोबत सत्रे, लिंबू, मोसंबी, डाळिंब इत्यादी फळपिकांची गळती झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळी बाजरी,ज्वारी, गहू , हरभरा, कांदा, मका इत्यादी पिके पूर्णपणे झोपली गेल्याने तोंडात आलेला घास अवकाळीने हिरावून नेला आहे.

“माझ्याकडे दोन एकर डाळिंबाची बाग व तीन एकर कांदा असून डाळिंबाची बाग ऐन कळी निघण्याच्या मार्गावर आहे. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून एक लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र शनिवारी दुपारच्या सुमारास झालेल्या गारपिटीने संपूर्ण कळी गळून पडली आहे तसेच रब्बी हंगामातील काढणीस आलेला कांदा जागेवरच सडून गेला. त्यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून सात दिवसांत नुकसान भरपाई द्यावी. पोटच्या लेकराप्रमाणे डाळिंबाची बाग जपली असून क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.”

– अंकुश तळेकर, शेतकरी घाटापिंपरी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे