मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
1 min read
जालना दि.३१:- मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. पण ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार, असाही इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जरांगे यांचे वर्षभरातील हे सातवे आंदोलन आहे.
मनोज जरांगे यांच्याव्यतिरिक्त, महिलांसह कार्यकर्त्यांनी २५ जानेवारीपासून मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले. उपोषणदरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारच्यावतीने अंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतली. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना काही आश्वासने देण्यात आली. त्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन झालेल्या कक्षामार्फत कार्यवाही करणार.हैदराबाद गॅझेट तपासून शिंदे समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल.
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु केली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे उच्च न्यायाच्या निर्देशानुसार आणि शासन निर्णयानुसार तपासून मागे घेणार. मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता गुन्हे तपासून मागे घेणार, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, मी पुढे जाण्यासाठी वेगळी रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांचा हेतू आहे का? हे स्पष्ट करावे. मी फडणवीस यांना बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले, पण ते गप्प राहिले.
या मुद्द्याला कोण खरोखर समर्थन देते आणि कोण नाही, हे उघड करण्यासाठी माझे उपोषण होते. मी मुख्यमंत्र्यांना शांत बसू देणार नाही. मराठा समाजाला आता कळले आहे की, चूक कोणाची आहे. सत्तेत आल्यानंतर फडणवीस यांनी मराठ्यांचा विश्वासघात केला आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन बाळगले, असे मनोज जरांगे म्हणाले.