वेडेवाकडे प्रकार सहन करणार नाही; बीडमध्ये पाऊल ठेवताच अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

1 min read

बीड दि.३१:- उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्याची डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. ‘चुकीचं वागला तर कारवाई केली जाईल. नियमाप्रमाणे कलमे लावली जातील. मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही.’ असा दम त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. अजित पवारांनी हा इशारा नेमका कोणाला दिला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, ‘माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे यावर माझा भर असतो. या कामांमध्ये जर वेडेवाकडे काम केले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा आहे की लांबचा हे मी पाहणार नाही. विकासाची काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या ते कानावर आल्यानंतर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही.’ असा थेट इशारा अजित पवारांनी दिला. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करू. काम करताना दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा. चारित्र्य स्वच्छ ठेवा. जवळचा असला तरी चुकीचं वागू नका.’, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केले. तसंच, ‘सरड्यासारखे रंग बदलणारे लोक सगळीकडेच असतात. तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई करणार. अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल त्यावर कारवाई होणार.’, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. काही सहकाऱ्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सत्करणी लागला पाहिजे. त्यात कुठलीही गडबड होता कामा नये. कारण मर्यादीत प्रमाणात पैसा मिळतो. केंद्रातून निधी कसा आणता येईल, त्यासाठी प्रयत्न करु. डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वसामान्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, त्यासाठी प्रयत्न करु. तुमच्याकडून कुठलीही चूक होता कामा नये, असं अजित पवार म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे