मोठी बातमी! हिवरे तर्फे नारायणगावात २० एकर ऊस जळाला; जाळीत ऊस तात्काळ तोडणार:- चेअरमन सत्यशील शेरकर
1 min read
हिवरे तर्फे नारायणगाव दि.३०:- हिवरे तर्फे नारायणगाव येथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागून साधारण २० एकरावरील ऊस जळाला. यामध्ये काही एकरांवरील पाईपलाईनचेही नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेची माहिती कळताच विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी शेतकी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जळीत प्लॉट ला भेट देऊन ऊसाची पाहणी केली व तात्काळ पंचनामा करून जळीत झालेल्या ऊसाची लगेच यंत्रणेमार्फत तोडणी करून ऊस गाळपास कारखान्यावर पाठवण्यासंदर्भात त्यांना सूचना केल्या.
यावेळी ऊस उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान न होता तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी महावितरण विभागामार्फत पंचनामा करून नुकसान भरपाई प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती शेरकर यांनी महावितरणच्या अधिकार्यांना फोनद्वारे केली.
आपल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वारंवार शेतकर्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी येथून पाठीमागच्या काळातही कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने महावितरणला बऱ्याच वेळा निवेदने दिली आहेत.
किमान आता तरी महावितरण मार्फत सर्व डीपी, खाली आलेल्या विद्युत वाहक तारा व वितरण व्यवस्था याचे सर्वेक्षण करून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे शेतकी अधिकारी कर्मचारी व खोडद गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.