विद्यानिकेतन संकुलनातील परेड, नृत्य लेझिम सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम
1 min read
साकोरी दि.२८:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अँकॅडमी व पी. एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साकोरी (ता.जुन्नर) येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक व कवी मा.ज्ञानेश्वर धुमाळ (अखिल भारतीय साहित्यिक संघटना, मंचर) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या वेळी संस्थेचे संस्थापक तसेच प्राचार्य देखील उपस्थित होते. संकुलनातील विद्यार्थ्यांनी परेड, लेझिम, नृत्य व भाषणे असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या छोट्या छोट्या बालचमुंनी ज्या क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र व्हावा या साठी आपल्या देहाचे बलिदान दिले अशा थोर क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख पाहुणे धुमाळ सर यांनी भूषवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सोनवणे यांनी केले. तर सांस्कृतीक कार्यक्रमांचे नियोजन सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. दिपाली ढवळे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे पी. एम. साळवे, विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव), उपप्राचार्य शरद गोरडे, पी. एम हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य रमेश शेवाळे, साकोरी ग्रामस्थ,
परिसरातील सर्व नागरिक, विद्यालयाचे माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते. शेवटी विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.