जुन्नर तालुक्यात पुन्हा रेशन चा काळाबाजार उघड
1 min read
शिंदेवाडी दि.१३:- जुन्नर तालुक्यातील पेमदरा गावातील रेशन घोटाळा ताजा असतानाच आता शिंदेवाडी (ता.जुन्नर) गावातील रेशन दुकानात ७ टन धान्याचा घोटाळा उघड झाला असल्याने सदर दुकानदाराला जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कारणे दाखवा नोटीस दिली. शिंदेवाडीतील नागिरक प्रदीप पांडुरंग शिंदे व निलेश भागवत शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुका पुरवठा अधिकारी यांनी शिंदेवाडीतील रेशन दुकानाचा पंचनामा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्याबद्दल कारवाईसाठी दि.११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समोर रेशनदुकानदाराला सुनावणीसाठी बोलावले होते.
या संदर्भात गावातील तरुण निलेश शिंदे यांनी पुरवठा विभागाला ऑनलाईन तक्रार दि.६ फेब्रुवारी रोजी केली होती. अशी माहिती निलेश शिंदे यांनी दिली.तरी सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, कोणतेही खोटे जबाब देऊ नयेत आणि गोरगरीब जनतेच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराला गावातील जे काही नेतेमंडळी पाठीशी घालत आहेत ते त्यांनी बंद करावे असे आवाहन तक्रारदार निलेश शिंदे यांनी जनतेला केले आहे.
तक्रारीवरून दुकानात पाहणी केली असता पुरवठा विभागाला खालील दोष आढळून आले असल्याचं संबंधित नोटिसमध्ये म्हटलं आहे. दोष क्र. १ – NFSA + PMGKAY अंत्योदय + प्राधान्य तांदूळाचा आवक जावक ताळमेळ घेतला असता ५९६० किलो कमी आढळला. दोष क्र. २ NFSA+PMGKAY अंत्योदय प्राधान्य गव्हाची आवक जावक ताळमेळ घेतला असता १७८२ किलो कमी आढळला. दोष क्र. ३ – ४ किलो साखर दुकानात जास्त आढळली.दोष क्र. ४- साठा फलक अद्ययावत नाही.दोष क्र. ५- दुकानदार पावत्या देत नाही अशी कार्डधारकांची तक्रार आहे. दोष क्र. ६ – सर्वोच्च न्यायालयाची आदेशाची प्रत दुकानात लावली नाही.दोष क्र. ७ तक्रार बुक दर्शनी भागात ठेवले नाही.दोष क्र. ८ – विक्री रजिस्टर ठेवला नाही.सदर तपासणी दोषांच्या अनुषंगाने पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांचे समक्ष दि. ११ एप्रिल रोजी सुनावणी ठेवणेत आलेली होती.
“गावातील कोणाचीही काही तक्रार नाही परंतु गावातील दोन- तीन व्यक्तीनी जाणून बुजून भावकीच्या वादातून मुद्दाम दुकानाबद्दल तक्रार केली आहे. त्यामुळे मी सततच्या या त्रासाला कंटाळलो असून स्वस्त धान्य दुकानाचा राजीनामा देत आहे.”
मारुती शंकर शिंदे
रेशन दुकानदार शिंदेवाडी