जुन्नरमध्ये ‘नो फ्लेक्स झोन’ करा:- आमदार शरद सोनवणे
1 min read
जुन्नर दि.२३:- जुन्नरमधील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘नो फ्लेक्स झोन’ करा, असे निर्देश जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी प्रशासनाला दिले. शिवजयंती सोहळा नियोजन बैठकीत ते बोलत होते. राजकीय, श्रद्धांजली, दशक्रिया, वाढदिवस शुभेच्छा अशा प्रकारचे फ्लेक्स या ठिकाणी लावले जाणार नाहीत याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार डॉ. सुनील शेळके, पोलिस निरीक्षक किरण अवचर, वन परीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण,
पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बाबासाहेब जंगले यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, विविध दुर्गप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.’शिवजयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सरकारने केले आहे; मात्र या नियोजनात स्थानिकांचा सहभाग राहील.
त्यासाठी कार्यक्रम नियोजनाची सुकाणू समिती तयार करून कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल,’ असे आमदार सोनवणे यांनी सांगितले.या महोत्सवाच्या नियोजनाची माहिती विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार, शिवजयंती सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी ३९ जागा निश्चित केल्या असून, ६३ एकर क्षेत्रावर पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. किल्ले शिवनेरीवर विविध इमारतींना विद्युत रोषणाई, गडावर लेझर शो, शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी २५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आठ रुग्णवाहिका, पाच वैद्यकीय पथके,
आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास दहा ऑक्सिजन बेड, २० आयसीयू बेड; तसेच कार्डियाक अॅम्बुलन्सदेखील उत्सव काळात तैनात ठेवण्यात येणार आहे.मंत्र्यांची हेलिकॉप्टर उतरण्यासाठी शिवनेरी गडावर एक, तर जुन्नरमध्ये चार हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. शिवनेरी पायथा ते पायरीमार्ग येथे ये-जा करण्यासाठी चार मिनीबस असतील.