तुर्कीमध्ये स्की रिसॉर्टला भीषण आग; ६६ जणांचा होरपळून मृत्यू

1 min read

अंकारा दि.२२:- तुर्कस्तानच्या बोलू पर्वतरांगांमधील ग्रँड कार्टल हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत ६६ जणांचा होपपळून मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक जण जखमी झाले. तसेच, आगीमुळे घाबरलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या. ही घटना वायव्य तुर्कीमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या कार्तलाकाया स्की रिसॉर्टमध्ये घडली. रिसॉर्टमध्ये २३४ जण होते.१२ मजली हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या मजल्यावर पहाटे ३.३० वाजता आग लागली आणि लवकरच ती संपूर्ण इमारतीत पसरली. हॉटेलमध्ये धुराचे लोट पसरल्याने आणि हॉटेलची अग्निशमन यंत्रणा काम करत नसल्याने होटेलमध्ये थांबलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यात भीतीने उडी मारल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांनी वरच्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी बेडशीटपासून बनवलेल्या दोऱ्यांचा वापर केला. तर काहींनी आगीपासून वाचण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारल्याची माहिती आहे.तुर्कीचे मंत्री अली येर्लिकाया यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘तुर्कीच्या बोलू प्रांतातील कार्तलकाया रिसॉर्टमधील एका इमारतीमध्ये पहाटे 3.27 वाजता आग लागली. आगीत दुर्देवाने 66 पर्यटकांनी जीव गमावला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर आहे. रिसॉर्ट आगीच्या ज्वालांनी वेढलेले असताना अनेक लोकांनी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच 28 रुग्णवाहिकांनाही तेथे पाठवण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे