पद्म पुरस्काराची घोषणा; महाराष्ट्रातील डॉ. विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवारांना पद्मश्री जाहीर
1 min read
नवीदिल्ली दि.२६:- ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांचा समावेश होतो. या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ज्यामध्ये साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवा तसेच प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे.
विलास डांगरे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. संपूर्ण विदर्भात त्यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख आहे. गेल्या ५० वर्षांपासून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. मागास, गरीब रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणून ते परिचित आहेत.
त्यांनी अनेक डॉक्टरांना प्रशिक्षित करत एक नवी पिढी घडवली. विशेष म्हणजे स्वत:ला दृष्टीदोष उद्भवलेला असतानाही त्यांचं वैद्यकीय कार्य सेवा थांबलं नाही. त्यांची सेवा अखंड आणि अविरतपणे सुरु होती. गेल्या ५० वर्षांत त्यांनी १ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.
वनं आणि वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या चैत्राम देवचंद पवार यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. ४०० हून अधिक हेक्टर वनक्षेत्र वाढवण्याच्या कार्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी ५ हजारांहून अधिक झाडं लावली. ४५८ लहान तळी आणि ४० मोठी तळी त्यांनी बांधली.
त्यांच्या या कामामुळे त्या भागांमधील भूजल पातळी वाढली. धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या ८ आणि ४८ पक्षांच्या प्रजातींचं संवर्धन करण्याचं काम त्यांनी केलं. झाडांच्या, रोपांच्या प्रजातींचं संवर्धन करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.
पर्यावरणाशी संबंधित लेखन करणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पर्यावरण विषयक २० हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्राणी, पक्ष्यांची डिक्शनरी लिहिली आहे. त्यासोबतच त्यांनी वनाधिकारी म्हणूनही काम केलं आहे.
निसर्ग, पर्यावरणाशी नाळ जोडलेला साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानं अतिव आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुरस्कार जाहीर झाल्याचं समजताच मी निशब्द झालो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.