दावोस परिषदेत महाराष्ट्राचा डंका; 5 लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक

1 min read

दावोस दि.२२:- दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिल्झर्लंड दौऱ्यावर गेले आहेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक होणार असून विविध कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत. आज एकाच दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली असून. आज दिवसभरात 4 लाख 99 हजार 321 कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. गडचिरोली, पुणे, रत्नागिरी, नागपूर या भागांमध्ये विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उद्या आणखी कंपन्यांमध्ये करार होण्याची शक्यता आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले कि, दावोसमधून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना आनंद होत आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्रासामधील गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मला सांगताना आनंद वाटतो की, आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक आणण्यात यश मिळालं आहे. उद्या देखील अशाप्रकारची गुंतवणूक आणण्यात यश मिळेल. मी जसं महाराष्ट्रातून दावोसला येत असताना सांगितलं होतं. विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, त्याला आज सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्यावर टाकलेला विश्वास महायुतीच सरकार म्हणून आम्ही सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे