ज्ञानमंदिर येथे ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन

1 min read

आळेफाटा दि.२१:- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (एच.एस.सी.) फेब्रुवारी मार्च 2025 अंतर्गत “कॉपीमुक्त अभियानांतर्गत ” आयोजित केला जाणारा जनजागृती सप्ताह ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे येथे सोमवार दि.20 पासून सुरू झाला. असून मंगळवार दि. 21 रोजी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कॉपी मुक्त अभियानाची शपथ विद्यार्थ्यांनी घेतल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी यांनी दिली. काल स्थानिक लोकप्रतिनिधी शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करून कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याची माहिती दिली. आज महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मैदानावर एकत्र जमून त्यांनी परीक्षेमध्ये कॉपी न करण्याची शपथ घेतली. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करण्याची व अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यापासून परावृत्त करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले तर शपथेचे वाचन दाभाडे यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व सर्व संचालक मंडळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या अभियानांतर्गत दिनांक 22 रोजी उत्तरपत्रिकेतील सूचनांचे अवलोकन विद्यार्थ्यांना केले जाईल. दि. 23 रोजी परीक्षा काळात घ्यायचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत उद्बोधन केले जाईल. दि. 24 रोजी विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षेसाठी तज्ञांचे मार्गदर्शन आणि मंडळाकडून तयार केलेली चित्रफित दाखवली जाईल. दि. 25 महाविद्यालयात जनजागृतीसाठी कॉपीमुक्त घोष वाक्यसह जनजागृती फेरी काढली जाईल तर रविवार दि. 26 रोजी ग्राम सभेतील बैठकीमध्ये मुख्याध्यापक कॉपीमुक्त अभियानाची माहिती पालकांना देतील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे