श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा
1 min read
बेल्हे दि.१९:- भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संदर्भीय पत्रानुसार ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत संविधान सप्ताह निबंध, वक्तृत्व, चित्रकला, पोस्टर सादरीकरण, पथनाट्य, व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य अजीत अभंग यांनी दिली.दि. १५ जानेवारी २०२५ ते दि. १९ जानेवारी २०२५ दरम्यान विद्यालयात संविधान जागृती,
संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व, संविधानिक मूल्ये या विषयांवर आधारित विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. संविधानावर आधारित चित्र रंगविण्यात बालचमू दंग झाले होते.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून व सर्जनशीलतेतून साकारलेल्या आकर्षक पोस्टरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संविधान जनजागृतीसाठी विद्यालयात ‘माझा देश, माझे संविधान’ या विषयांवर आधारित तीन पथनाट्ये सादर करण्यात आली. आपला कसदार अभिनय आणि प्रभावी संवादफेक यांद्वारे पथनाट्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली.
संविधान सप्ताहाच्या सांगता समारंभानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संविधानाचे महत्त्व रुजविण्यासाठी कायदेतज्ञ अँड. शंकर धरम यांचे ‘संविधानातील मार्गदर्शक तत्वेः हक्क व कर्तव्ये’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते अँड. शंकर धरम यांनी संविधाननिर्मितीची रोचक कहाणी विद्यार्थ्यांसमोर उलगडली.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंतचा संविधानाचा कालपट त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडला. संविधान सप्ताहाचे औचित्य साधून शालेय व्यवस्थापन समिती सदस्य राकेश डोळस यांच्या वतीने विद्यालयास भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती सप्रेम भेट देण्यात आल्या.
त्यांच्या समवेत विजय वाघमारे हे मान्यवरही उपस्थित होते. युवा उद्योजक सुमित बोरचटे सांगता समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख कोमल कोल्हे व सहकाऱ्यांनी संविधान सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले.