शमशुद्दीन पटेल यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

1 min read

जुन्नर दि.१९:- जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा तालुका स्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार बोरी खुर्द येथील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दिन चांद पटेल यांना नुकताच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी रावसाहेब आवारी (संस्थापक अध्यक्ष,अखिल महा. माध्य.व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ), मा. जी.के.थोरात (अध्यक्ष महा. टी.डी.एफ.), मा.के.एस. ढोमसे (कार्यवाह महा. टी.डी.एफ), पंकज घोलप (अध्यक्ष पु.जि.माध्य.शिक्षक संघ) व जुन्नर तालुका सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे म्हणाले जुन्नर तालुका हा शैक्षणिक प्रगतीत अग्रेसर आहे. शिक्षकांच्या अथक प्रयत्नातूनच हे घडले आहे. शमशुद्दिन पटेल यांनी त्यांच्या सेवाकाळात शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी अविरत प्रयत्न केले. शाळेचा व इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा गणित, विज्ञान या विषयांचा निकाल सतत शंभर टक्के लावला. एस एस सी बोर्ड परीक्षेचे गणित विषयाचे मॉडरेटर म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे उत्तम असे काम केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस.परीक्षेत राज्य, राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.अनेक विद्यार्थी परदेशातही उच्च पदावर काम करत आहेत. इनस्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातही विद्यार्थ्यांनी राज्य पातळीपर्यंत यश मिळवले आहे.मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी सर्वोन्नती मंडळाचे सचिव, नरहरी शिंदे, अध्यक्ष, विक्रम शिंदे, उपाध्यक्ष, लक्ष्मण काळे, मा.सरपंच, ज्ञानेश्वर शेटे व अनेक ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे