“जयहिंद च्या विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी” धनगरवाडी येथे ऐतिहासिक बारव स्वच्छता अभियान
1 min read
नारायणगाव दि.१७:- २०५० पर्यंत जगात पाण्याची मागणी आहे त्यापेक्षा पन्नास टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध करायचे कसे हा प्रश्न सर्वच देशांसमोर आहे. पावसाचे पाणी साठवणे, उपलब्ध पाण्याचा विवेकाने वापर करणे आणि ठिकठिकाणचे पाण्याचे प्राचीन-ऐतिहासिक स्रोत जपणे हे काही उपाय गरजेचे आहे. असे मत वन अधिकारी रमेश खरमाळे यांनी व्यक्त केले. कुरण येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी धनगरवाडी येथे ऐतिहासिक “बारव स्वच्छता अभियान” राबविले याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बारव म्हणजे पायऱ्यांची विहिर, अनेक ठिकाणी पारंपरिक बारव आढळतात ज्यांची सद्यस्थिती अजिबात चांगली नाही. कचऱ्याने भरलेली, पाणी प्रदूषित झालेली गावातील बारव आणि हांडेभांडे डोक्यावर घेऊन पाण्यासाठी भटकंती करणारी बायकापोरे हे अनेक गावातील सामान्य दृश्य आहे.
पाण्याचे अन्य स्रोत उपलब्ध होऊ लागल्याने त्यांचा वापर थांबला आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या बारव दुलर्क्षित आणि अस्वच्छ आहेत. कचरा टाकून त्यांची कचराकुंडी बनली आहे. काही बारव गाळाने भरलेल्या आहेत. या बारवांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करण्याचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उद्देश आहे.
तो साध्य झाला तर लोक विद्यार्थ्यांना दुवा देतील. यानिमित्ताने त्यांचे संवर्धन झाले तर स्थानिक परिसरात लोकांना पाण्याचा कायमचा स्रोत उपलब्ध होईल, असे मत व्यक्त करून त्यासाठी जुन्नर बाजार समितीच्या सदस्या प्रियंका शेळके यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथील ऐतिहासिक बारवचे संवर्धन करण्याचा निर्णय जयहिंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने घेतला त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे उद्गार धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांनी काढले.
कायमचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या बारव स्वच्छ ठेवणे आणि त्यांची जपणूक करणे ही सरकार आणि समाज यांची संयुक्त जबाबदारी आहे. कारण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून या स्वच्छता मोहिमेचे महत्त्व अधिक आहे असे प्रतिपादन जयहिंद च्या संचालिका डॉ शुभांगी गुंजाळ यांनी काढले.
यावेळी माजी सैनिक संघ शिवनेरीचे अध्यक्ष एकनाथ वाजगे, रमेश शेळके, राजेंद्र शेळके, अजय शेळके, धीरज पाटोळे, अजित शेळके, ग्रामसेवक विठ्ठल बढे, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. बारव संवर्धनाने पाणीटंचाईची समस्या काहीशी निकालात निघू शकेल.
या उद्देशाने अतिशय अवघड असणारे हे काम जयहिंद या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वास्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. जी. एस. सुपेकर तर नियोजन आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. ए. गाडेकर यांनी केले.