व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल मध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव
1 min read
नगदवाडी दि.१६:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित’ व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये मकर संक्रांत निमित्त विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तो म्हणजे ‘पतंगोत्सव’, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात जयश्री कुंजीर यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वा विषयी माहिती दिली. मकर संक्रांत हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेश केल्याचा संकेत देतो आणि तो हिवाळ्याच्या शेवटचा वसंत ऋतुच्या सुरुवातीचा सण मानला जातो. या दिवशी तिळगुळ वाटण्याची आणि पतंग उडवण्याची परंपरा कशी आहे, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या या व्याख्यानानंतर मैदानावर पतंग उडवण्याचा आनंद लुटला. आकाशात उडणाऱ्या रंगबेरंगी पतंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “पतंग उडवताना आमच्या मैत्रीची मजा वाढली.” असे एका विद्यार्थ्याने उत्साहाने सांगितले.
तर दुसऱ्या विद्यार्थ्याने पतंग उडवण्याचा अनुभव ‘शांत आणि प्रेरणादायी’असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगण्याची संधी देण्यात आली. या उपक्रमातून त्यांना एकत्रितपणे काम करण्याची, निसर्गाशी जवळीक साधण्याची आणि सणाच्या महत्त्वाची जाणीव झाली.
अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि एकात्मतेला चालना मिळते, हे नक्की. व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूलने घेतलेला हा सुत्य उपक्रम सर्व शाळांसाठी आदर्श आहे. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
समन्वयिका,सर्व शिक्षक व विद्यार्थी मिळून हा पतंगोत्सव उत्साहात संपन्न झाला.विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचेही या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.