कल्याण अहिल्या नगर महामार्गाचे रुंदीकरण करा, दुभाजक टाका अतिक्रमण हटवा:- विलास कुटे
1 min read
आणे दि.१२:- कल्याण अहिल्यानगर महामार्गाचे रुंदीकरण व्हावे व दुभाजक टाकावे अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हा कार्यकारणी संयोजक पुणे जिल्हा सदस्य विलास कुटे व भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष व पेमदरा गावचे उपसरपंच बाळासाहेब दाते यांनी केली आहे.या बाबत विलास कुटे यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, कल्याण विशाखपट्टणम ह्या महामार्गाचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर काँक्रीटीकरण सध्या सुरू केले आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. प्रथम रस्ता रुंद करणे गरजेचे होते. तसे न करता डांबरी रस्त्यावर काँक्रीटचे काम सुरू केले.
पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या मोऱ्यांवर काँक्रीटीकरण केले नाही. त्यामुळे रस्त्याची फक्त एकच बाजू दुहेरी वाहतुकीसाठी वापरली जात आहे. त्यामुळे आळेफाटा ते ओतूर परिसरातील अनेक ग्रामस्थांचे जीवघेणे अपघात झाले आहेत. ठेकेदाराने सुरक्षित वाहतुकीसाठी कोणतीही उपाय योजना केली नाही.
त्यामुळे नागरिकांचे जीव गेल्याचा आरोप विलास कुटे यांनी केले आहे.अश्याच पद्धतीने राजगुरुनगर येथील पेठ च्या घाट परिसरात सध्या काँक्रीटीकरण चालू असून तेथील ठेकेदार नागरिकांच्या जीविताची काळजी घेऊन योग्य त्या पद्धतीने वाहतूक नियोजन करत आहे.
त्यासाठी मनुष्यबळ वापरल्याचे, दक्षता घेतल्याचे दिसून येते. मग आळेफाटा ते ओतूर येथे काम करताना संबंधित ठेकेदार काळजी का घेत नाही.ओतूर येथील ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या बेजाबदारपणामुळे त्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे शासनाचे ही नुकसान आर्थिक नुकसान होत आहे तर ग्रामस्थांना मनस्ताप होत आहे.
त्यामुळे ठेकेदाराने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांची जीवितहानी होऊन कुटुंबे उद्धवस्त होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे. तसेच पुढील काम सुरू करताना रस्ता तातडीने आणखी रुंद करण्यात यावा.
रस्त्यालगतची अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. तसेच रस्त्याच्या मध्यभागी काँक्रीटचे दुभाजक बसविण्यात यावेत. त्याची उंची समोरील गाडीचे दिवे डोळ्यावर येणार नाहीत इतकी असावी. तसेच दुभाजकात झाडे नसावीत. त्यामुळे देखभालीचा खर्च वाचेल.
ह्या बाबत तातडीने निर्णय घेण्यात यावेत. जनतेची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. घरातील कर्ता पुरुष अपघाती मृत्यू पावला, त्यापोटी नुकसान भरपाई दिली तरीही त्याची उणीव भरून येत नाही. त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आदेश व्हावेत ही विनंती.
असे निवेदन ही त्यांनी मुख्यमंत्र्यांना व सामाजिक बांधकाम विभागाला दिले आहे. तसेच आणे येथे डांबरी गती रोधक टाकले असून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ब्रेकरचे बोर्ड लावावेत व पांढरे पट्टे मारावेत. अशी ही मागणी बाळासाहेब दाते यांनी केली आहे.