राजुरी मध्ये रासेयो मार्फत श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

1 min read

राजुरी दि.१३:-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्टीय सेवा योजना व समर्थ काॅलेज ऑफ इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट, समर्थ काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स, समर्थ लॉ कॉलेज, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर राजुरी (ता.जुन्नर) येथे ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या शिबिरातील विद्यार्थ्यांनी जल संवर्धन ही काळाची गरज ओळखून नियोजन बद्ध रित्या गावचे सर्वेक्षण करून बंधाऱ्यांविषयी माहिती संकलित केली. आणि डोबी डुंबरे मळयातील ओढयावर श्रमदानातून वनराई बंधारे बांधले आहेत. यामध्ये एका ओढयाला वाहते पाणी आडवून त्या ठिकाणी २३५ सिमेंट च्या गोणींमध्ये वाळू भरून त्या एकमेकांवर रचत चार-पाच थर तयार करून हा बंधारा बांधला.हे बंधारे बांधल्याने पूर्वेकडून येणारे पाणी बऱ्याच अंशी अडवले जाऊन त्याचा विहिरी, बोरवेल व शेतीपूरक उद्योगधंद्यासाठी विनियोग होणार असून पूर्ण परिसर जलमय होणार आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात वावरताना आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजनेतील २७५ विद्यार्थ्यांनी राजुरी गावचे सर्व्हेक्षण करून या बंधाऱ्याच्या माध्यमातून जलसंवर्धन-पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तिमंत स्वरूप प्राप्त करून दिल्याने स्थानिकांकडून कौतुक केले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांवर श्रमदानातून श्रमसंस्कार घडवले जातात आणि हेच संस्कार देशाचं उज्वल भवितव्य घडवण्यासाठी अत्यंत मौलिक असल्याचे युवा नेते वल्लभ शेळके म्हणाले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, गोपाळ नाना हाडवळे, स्वप्नील हाडवळे, प्रवीण कणसे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर, रासेयो समन्वयक प्रा.भूषण दिघे, कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव, प्रा.रुपेश कांबळे, प्रा.अश्विनी खटिंग, प्रा.कल्याणी शेलार, प्रा.सोमनाथ गाडेकर, प्रा.अजय भागवत आदी मान्यवर तसेच स्थानिक शेतकरी भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांकडे पाहून सरपंच व स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. सर्व ग्रामस्थांचे या कामी विशेष सहकार्य लाभले.सर्व उपस्थितांचे प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे