संतोष देशमुख हत्ये प्रकरणी दोन फरार आरोपींना अटक
1 min read
बीड दि.४:- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येला २५ दिवस होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही.
यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभासेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
डॉ.वायभासे यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती,अशी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत.
विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना याआधीच अटक करण्यात आली होती. यानंतर आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे.