यंदा आण्याच्या यात्रेत महाप्रसादासाठी १३ लाख रुपयांचा मसाला, ६९ कढाया आमटी
1 min read
आणे दि.२६ :- आणे (ता.जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्सव सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाची सध्या रेलचेल सुरू आहे. आणे (ता.जुन्नर) गावात २४ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्त दिवसभर काकडा भूपाळी, पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, महाप्रसाद, जागर असे विविध कार्यक्रम आहेत.मंगळवार (दि.३१) व बुधवार (दि.१) अशा दोन दिवस राज्यातील प्रसिद्ध आमटी भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
गेल्या वर्षी ५५ कढया आमटीचा महाप्रसाद केला गेला होता परंतु यंदा ६९ कढया आमटी केली जाणार आहे. तर ७० ते ७५ क्विंटल बाजरीच्या भाकरी आसपास च्या गावातून वाजत- गाजत येणार आहेत. मंगळवार दि.३१ रोजी दुपारी १२ वाजता महाआरती होणार असून बुधवार दि.१ रोजी सकाळी साडेनऊ ते बारा या वेळेत हभप श्रावण महाराज जगताप यांचे काल्याचे किर्तन होईल.
त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. या यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आळेफाटा पोलिसांच्या वतीने गावात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून भाविकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. यात्रोत्सवाला जास्तीत जास्त भविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर दाते,
आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते, उपसरपंच सुहास आहेर, माऊली संभेराव, शिंदेवाडी चे सरपंच अजित शिंदे, नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, एम डी.पाटील शिंदे, विजयकुमार आहेर, संतोष आहेर, माजी सरपंच रंगनाथ आहेर, किरण आहेर यांनी केले आहे.
तसेच यात्रोत्सवानिमित्त २९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये बैलगाड्यांच्या भव्य शर्यती भरवण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक ७५ हजार, द्वितीय क्रमांक ६५,तृतीय क्रमांक ५५ हजार असे बक्षिसांचे स्वरूप असेल.यावर्षी ही भाविकांना आमटीचा महाप्रसाद घरी दिला जाणार असून.
यासाठी पाच हजार पाच लिटरच्या किटल्या देवस्थानने आणल्या आहेत. यामध्ये भाविकांना घरी प्रसाद दिला जाणार आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच आमटीचा मसाला देवस्थान भाविकांना देणार आहे. यात्रेमध्ये स्टॉल लावला जाणार आहे.