बेल्हे जिल्हा परिषद शाळेत भरला आठवडे बाजार; विद्यार्थांनी केली २० हजार रुपयांची उलाढाल

1 min read

बेल्हे दि.२३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले.पुणे जिल्ह्यामध्ये बेल्हे हे गाव आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहाराचे खूप चांगले ज्ञान आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदी आठवड्या बाजाराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांनी मेथी, पालक, भोपळा, मिरची, वांगी, भेंडी असा अनेक प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. त्यासोबत विविध प्रकारची फळे, खाऊ गल्ली, कडधान्य, किरकोळ विक्रीच्या वस्तू बाजारामध्ये आणल्या होत्या.पालकांनी बाजाराला उत्कृष्ट प्रतिसाद देत आनंदी बाजारामध्ये सहभाग घेत बाजारात खरेदी केली. सर्वांच्या सहकार्यामुळे बाजारामध्ये वीस हजार रुपयांची उलाढाल झाली. ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी नायकोडी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ मूलमुले, उपाध्यक्ष सोईल बेपारी, सदस्य प्रितम मुंजाळ, वैशाली मटाले, संतोष पाबळे, राणी पारवे, शीतल गुंजाळ, शेखर पिंगट, स्वाती शेलार, अनिल पिंगट, तुषार डावखर, यांनी यावेळेस उपस्थित राहून आंनदी बाजारात खरेदी केली.सर्व उपस्थित मान्यवरांनी, पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. इतर वेळी आपल्या आई वडिलांबरोबर बाजार आणण्यासाठी जाणारे बालचमु आज स्वतः वस्तूंची देवाण-घेवाण करत होते व व्यवस्थित पैशाचा हिशोब करत होते हे पाहून शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर, उपशिक्षिक हरिदास घोडे, संतोष डुकरे, सुवर्णा गाढवे, कविता सहाणे, प्रविणा नाईकवाडी, योगिता जाधव, सुषमा गाडेकर, अंजना चौरे या सर्व शिक्षकांनी या आनंदी बाजाराचे नियोजन केले. केंद्रप्रमुख सोपान बेलकर विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे