भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

1 min read

ब्रिस्बेन दि.१८:- क्रिडा विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू, फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या गाबा कसोटीनंतर अश्विनने ही सर्वात मोठी घोषणा केल्याने क्रिडा विश्वात खळबळ उडाली आहे.अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यात त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. रवींद्र जडेजानं ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी केल्यामुळे कदाचित अश्विनला भविष्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अश्विननं हा निर्णय घेतला.अश्विननं निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी तो ड्रेसिंग रूममध्ये भावूक दिसत होता. विराट कोहलीनं त्याला मिठी मारली. आज सामना संपल्यानंतर याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आर अश्विन स्वत: सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत आला आणि त्यानं तत्काळ निवृत्तीची घोषणा केली. पत्रकार परिषदेत रविचंद्रन अश्विन म्हणाला, सर्व फॉरमॅटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मला वाटतं की क्रिकेटपटू म्हणून माझ्यात अजूनही काही शिल्लक आहे. पण मी फक्त क्लब लेव्हल क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.अश्विननं त्याच्या एक्स-पोस्टवर लिहिलं की, खूप विचार केल्यानंतर मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचं प्रतिनिधित्व करणं हा एक अविश्वसनीय प्रवास होता. मी माझे सहकारी, प्रशिक्षक, बीसीसीआय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाहत्यांचं त्यांच्या अतूट समर्थनाबद्दल आभार मानतो. माझ्या हृदयात कसोटी क्रिकेटचं नेहमीच खास स्थान असेल. भारतासाठी 287 सामने खेळणारा रविचंद्रन अश्विन भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही. मात्र, तो आयपीएल खेळत राहणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी त्याला 9.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 2025 मध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यास चेन्नई संघ त्याला पुन्हा कायम ठेवू शकतो.ऑफस्पिनर अश्विननं भारतासाठी एकूण 287 सामने खेळले. यापैकी त्यानं 106 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 537 विकेट घेतल्या आहेत. त्याला 200 डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. तो 37 वेळा पाच बळी घेण्यात यशस्वी ठरला. तर 8 वेळा तो सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे. डावात 59 धावांत 7 बळी आणि सामन्यात 140 धावांत 13 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर अश्विननं 116 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 156 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अश्विनला एकदाही पाच बळी घेता आले नाहीत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्यानं 65 सामन्यात 72 विकेट्स घेतल्य.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे