व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनातून रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
1 min read
वडगाव कांदळी दि.१५:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांचा विकास व्हावा तसेच त्यांचे निखळ मनोरंजनही व्हावे या दुहेरी हेतूने शाळेचे “वार्षिक स्नेहसंमेलन ” आयोजित करण्यात आले होते.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार शरद सोनवणे तसेच गावच्या सरपंच पल्लवी विक्रम भोर,
पिंपळ वंडीच्या सरपंच मेघा राजेश काकडे, गटशिक्षण अधिकारी जुन्नर अनिता शिंदे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले.
याप्रसंगी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे , उपाध्यक्ष दिनेश पाडेकर, सचिव विजय पारखे तसेच विश्वस्त विक्रांत काळे, संपत काने, दिलीप चासकर, चंद्रकांत सोनवणे, महेंद्र शिंदे आणि सी.ई. ओ. दुष्यंत गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अरुण पारखे – अध्यक्ष – विशाल जुन्नर सहकारी पतपेढी तसेच बजरंग शेळके (संचालक – विशाल जुन्नर सहकारी पतपेढी) यांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच ललित गाढवे – केंद्रप्रमुख – गुंजाळवाडी केंद्र हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरेल व सुमधुर सुरुवात इ.६ वी व ७ वी मधील विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने करण्यात आली.
तर विघ्नहर्ता – विघ्नविनाशक – गणपती बाप्पाच्या गाण्याने इ.७ वी व ८ वी तील विद्यार्थिनींनी नृत्याविष्कारास सुरुवात केली. उपस्थित प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते, विविध कला – कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके व पदके देऊन गौरविण्यात आले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सदाबहार कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या पवित्र भूमीत आपण जन्मलो आणि ज्यांच्या यशोगाथा ऐकून मोठे झालो ते स्वराज्य निर्माते “छत्रपती शिवाजी महाराज ” यांचा संपूर्ण जीवनपटच विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केला; आणि सर्वांचा उर अगदी अभिमानाने भरून गेला.
सरतेशेवटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेच्या शिक्षिका मनीषा हांडे व कीर्ती जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
इयत्ता ६ वी ते १० वी मधील काही निवडक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या समन्वयिका, कला शिक्षक क्रीडा शिक्षक, नृत्य व संगीत शिक्षक, सांस्कृतिक विभागातील शिक्षक, पूर्व प्राथमिक, प्राथमिक विभागातील सर्वच वर्गशिक्षक, विषय शिक्षक,
शाळेच्या प्रशासन विभागातील कर्मचारी या सर्वांनी घेतलेली विशेष मेहनत व योगदान यामुळे कामातील सुसूत्रता व उत्कृष्ट नियोजन दिसून आले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ही कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य लाभले. पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे तसेच सर्व सदस्य, सर्व उपस्थित पालक व विद्यार्थी यांच्या उत्तम सहकार्याने स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरळीत संपन्न झाला.
