अर्जाची छाननी सुरू; पुण्यातील १० हजार लाडक्या बहिणी अपात्र
1 min read
पुणे दि.१२:- लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील’ अर्जाची छाननी करण्याचे काम महिला व बालकल्याण विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. या योजनेसाठी प्रामुख्याने उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये तसेच लाभार्थीनी अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही अट आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. आता, छाननीमध्ये जिल्ह्यातील सुमारे १० हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे.महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतला.
अल्पकालावधीत या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला दि. १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. आचारसंहिता जाहीर झाल्याने अर्जाची छाननी बाकी होती. ती संपताच प्रशासनाने प्रलंबित अर्जाची छाननी सुरू केली आहे.
एकूण अर्जदारांपैकी ६९ हजार १७५ अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार ३६४ महिलांना लाभ मिळाला आहे, असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत.
शिवाय ५ हजार ७२४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी आढळल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. या अर्जदारांना त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आली आहे. एकूण प्रलंबित बारा हजार अर्जाची छाननी अद्याप बाकी आहे.
म्हणजेच आतापर्यंत सुमारे ९९.४३ टक्के अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी झालेल्या एकूण अर्जापैकी ६९ हजार १७५ अर्जाचे बँकेच्या खात्याशी आधार लिंक नसल्याचे समोर आले आहे, असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.
अपात्रतेची कारणे…
लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले, फोटो चुकीचा दिला, अर्जामध्ये अपुरी माहिती भरली, आधार लिंक नसणे, अडीच लाखांपेक्षा जादा वार्षिक उत्पन्न असणे, महिलांच्या नावे चारचाकी वाहन असणे तसेच आयकर भरत असलेल्या महिलांनी सुद्धा अर्ज भरल्याचे छाननीमध्ये निदर्शनास आले आहे.