जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची ४६ वी पुण्यतिथी साजरी
1 min read
मंगरूळ दि.९:- दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने गौरविलेले आणि कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम असा मरणोत्तर किताब प्राप्त झालेले जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची ४६ वी पुण्यतिथी नुकतीच जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव या त्यांच्या जन्मगावी साजरी करण्यात आली. या वेळी सकाळी जमादार बापूंच्या स्मारकाचे पूजन झाल्यानंतर सालाबादप्रमाणे शिवनेरी भूषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांचीच लागोपाठ ४६ व्या वर्षीही कीर्तनसेवा पार पडली. यानंतर जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून बापूंच्या स्मरणार्थ दिला जाणारा.
‘जमादार बापू लक्ष्मण लामखडे गुणगौरव पुरस्कार २०२४’ प्रदान सोहळा संपन्न झाला. यावर्षीचा गुणगौरव पुरस्कार स्तंभलेखक संजय नलावडे यांना शिवनेरीभूषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
‘शिवनेरीची श्रीमंती’ या संशोधनपर व्यक्ति चित्रांच्या संग्रहात विस्मृतीत गेलेल्या मान्यवरांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या आणि ‘निसर्गरम्य जुन्नर भूमी गुणिजनांची’ या फेसबुक सूमूह सदरातील अनेक लेख राज्यशासनाच्या मराठी विश्वकोशात सामील होण्याच्या
बहुमूल्य आणि प्रेरणादायी कार्यासाठी स्तंभलेखक संजय नलावडे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून या अगोदर डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, वृक्ष मित्र जालींदर कोरडे आणि शिवनेरीभूषण राजाराम महाराज जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी जमादार बापूंच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग आणि आठवणी सांगून पुरस्कार्थी स्तंभलेखक संजय नलावडे यांनी मंगरूळ ग्रामस्थ आणि जमादार बापू लक्ष्मण लामखडे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सरपंच ताराबाई लामखडे प्रतिष्ठानचे डॉ. बाळासाहेब लामखडे,
कैलास लामखडे, बाळकृष्ण लोहोटे, संजय लामखडे, दत्तात्रय लामखडे, विलास लामखडे, अमोल कसाळ, गोरक्षबाबा लामखडे, सचिन भोजणे आणि सर्व ग्रामस्थांनी या पुण्यतिथी समारंभासाठी विशेष परिश्रम घेतले. दत्ता लामखडे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले तर निलेश लामखडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.